मेक इन इंडिया सप्ताह

शनीवार, February 13, 2016
मेक इन इंडिया सप्ताह

 

मेक इन इंडिया सप्ताह

महाराष्ट्रातील कृषी व ऊर्जा क्षेत्रासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

·        पंतप्रधान नरेंद्र मोदी व  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

·        हिंदुस्थान कोकाकोला, रेमंड उद्योग समूह आणि ट्विन स्टार कंपनी यांच्यासोबत करार

 

            मुंबई, दि. 13 : महाराष्ट्रातील कृषी व ऊर्जा क्षेत्राला चालना देणाऱ्या तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील 'मेक इन इंडिया सेंटर' येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात विदर्भातील संत्रा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असे दोन आणि ऊर्जा क्षेत्रासाठीचा एक अशा तीन करारांचा समावेश आहे. देशातील उद्योगाला चालना देण्यासाठी आयोजित मेक इन इंडिया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या करारामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

            मेक इन इंडिया सप्ताहच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज मुंबईत आगमन झाले. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या मेक इन इंडिया सेंटरच्या उद्घाटनानंतर विशेष दालनात महाराष्ट्र शासनाचे तीन महत्त्वपूर्ण करार पंतप्रधान श्री. मोदी व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी राज्याचे कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे, उद्योग मंत्री सुभाष देसाई,सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल,औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, आमदार अनिल बोंडे,आशिष देशमुख आदी उपस्थित होते.

            विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी संत्रा ज्यूस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी  हिंदुस्तान कोकाकोला बेव्हरेज कंपनी, जैन इरिगेशन कंपनी  आणि राज्य शासनाचा कृषी व पणन विभाग यांच्यात आज करार झाला. यावेळी कोका कोला कंपनीचे इरिल फिनान,पी. कृष्णकुमार आणि जैन इरिगेशनचे अनिल जैन उपस्थित होते. या सामंजस्य करारानुसार  विदर्भात संत्रा व मोसंबी रस प्रक्रिया आणि त्याचा रस बोटलिंगमध्ये भरण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी होणार असून लोकांना नवीन रोजगार मिळणार आहे.  तसेच पाच हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

            रेमंड इंडस्ट्री आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात दुसरा सामंजस्य करार झाला. यावेळी रेमंडचे गौतम सिंघानिया उपस्थित होते. फार्म टू फॅब्रिक  धोरणानुसार हा करार करण्यात आला आहे. सुमारे 1400 कोटी रुपयांची गुंतवणूक या करारानुसार रेमंड समूह करणार असून लिनन व फॅब्रिक्स कापडाची उत्पादने या प्रकल्पात होणार आहेत. अमरावती येथील नांदगाव टेक्स्टाईल पार्क येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा करार आहे.

            राज्यात एलसीडी उत्पादनासंदर्भात राज्य शासनाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि ट्विन स्टार (स्टरलाईन कंपनी) यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. स्टरलाईन कंपनीचे अनिल अग्रवाल यावेळी उपस्थित होते. ट्विन स्टार कंपनी ही तैवानच्या ओट्रॉन या कंपनीसोबत तांत्रिक सहकार्य करून हा प्रकल्प उभारणार असून सुमारे वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात होणार आहे.